top of page

Panchkarma

चरक–सुश्रुत संहिता (इ.स.पूर्व १५०० वर्षे) सारख्या ग्रंथांमध्ये पंचकर्माचा उल्लेख आढळतो. ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘कर्म’ म्हणजे क्रिया. त्यामुळे पंचकर्म या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे – चिकित्सेला उपयुक्त अशा पाच प्रकारच्या क्रिया. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या पाच प्रकारच्या चिकित्सा पंचकर्म म्हणून ओळखल्या जातात.

 

शरीरातील वाढलेले वात–पित्त–कफ दोष बाहेर काढून टाकण्यासाठी तसेच शरीराचे आरोग्य पुनः प्राप्त करण्यासाठी या पद्धतीच्या क्रियांचा उपयोग होतो. स्वस्थ व्यक्तींनीही आरोग्य चांगले टिकावे यासाठी पंचकर्म उपचार घ्यावेत. फारशी थंडी, ऊन किंवा अतिवृष्टी नसलेल्या ऋतूमध्ये हे उपचार निरोगी व्यक्तींनी करून घ्यावेत.

पंचकर्माचा उद्देश

1. दोषांना आजार निर्माण करण्याआधीच शरीराबाहेर काढले जाते. त्यामुळे आरोग्य व शरीरशक्ती टिकून राहते.

 

 

2. शरीराची गुणवत्ता चांगली राहिल्यामुळे वार्धक्य लवकर येत नाही व निरोगी दीर्घायुष्य लाभते.

 

 

3. शरीरातील दोषांची स्थिती सम व कार्यक्षम ठेवली जाते.

त्यामुळे विविध आजार बरे करण्यासाठी पंचकर्म अत्यंत उपयुक्त ठरते.

 

 

 

थोडक्यात सांगायचे झाले तर अविरत काम करणाऱ्या शरीराची वेळेवर ‘सर्व्हिसिंग’ करण्याचे कार्य पंचकर्म करते. ही एक शुद्ध आयुर्वेदीय उपचारपद्धती आहे.

 

सध्या पंचकर्म या शब्दाचा व्यावसायिक गैरवापर होताना दिसतो. शिरोधारा, मसाज किंवा भाताच्या पिंडाने शेक देणे हे पंचकर्म नव्हे. अभ्यंग, शिरोधारा, पोटलीस्वेदन हे उपचार काही ठिकाणी पारंपरिक पद्धतींनी वापरले जातात, परंतु त्यांना पंचकर्म म्हणणे चुकीचे आहे.

 

पंचकर्म ही ‘physiological operations’ आहेत. त्यासाठी पूर्व व पश्चात ठरावीक उपचार करणे बंधनकारक आहे. पंचकर्मासाठी रुग्णाची योग्य तपासणी आवश्यक असते. रुग्णाच्या प्रकृतीनुसार पंचकर्माची चिकित्सा ठरविली जाते.

 

स्वस्थ व्यक्तीसाठी पंचकर्म हे आरोग्यरक्षणाचे साधन आहे, तर रुग्णासाठी रोगमुक्तीचा उपाय आहे. आपण पुढे प्रत्येक कर्माची सविस्तर माहिती घेणार आहोत. पंचकर्माविषयी योग्य समज समाजात निर्माण व्हावा व चुकीच्या प्रचाराला आळा बसावा हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना.

पंचकर्म पूर्व तयारी

पंचकर्म करण्यापूर्वी शरीर योग्य स्थितीत आणण्यासाठी व शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी काही पूर्वकर्म करावे लागतात. त्यात –

 

1. स्नेहन (शरीर स्निग्ध करणे)

 

 

2. स्वेदन (वाफ किंवा उष्णतेने शरीरास घाम आणणे व दोष मोकळे करणे)

 

 

 

हे दोन्ही पूर्वकर्म योग्यरीत्या झाल्यावरच मुख्य पंचकर्म उपचारांना यश मिळते.

बाह्य स्नेहन
DSC_5371_edited.jpg

स्नेहनात विविध स्निग्ध पदार्थांचा उपयोग होतो; प्रामुख्याने तेल व तूप यांचा वापर केला जातो. स्नेहनाचे दोन प्रकार –

 

1. आभ्यंतर स्नेहन (स्नेहपान) – पोटावाटे स्नेह घेणे.

 

पंचकर्मपूर्वी शरीर स्निग्ध, सक्षम व दोष बाहेर टाकण्यास तयार करण्यासाठी दिले जाते.

वमन व विरेचनाआधी तूप किंवा तेल पिण्यास दिले जाते.

रुग्णाची प्रकृती, कोष्ठशक्ती, ऋतु व आजारानुसार तूप/तेल निवडले जाते.

सुरुवातीला कमी मात्रेत देऊन क्रमाक्रमाने मात्रा वाढविली जाते.

स्नेहन पूर्ण झाल्याची लक्षणे ३–७ दिवसांत दिसतात.

 

 

स्नेहपानानंतर दोष शोधन उपचारांसाठी तयार होतात. या काळात सर्व कामांसाठी गरम पाण्याचाच वापर करावा. वैद्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन आवश्यक आहे.

 

 

2. बाह्य स्नेहन (अभ्यंग) – शरीरावर बाहेरून तेल लावणे.

 

सर्वात प्रचलित प्रकार अभ्यंग.

 

तेल त्वचेतील रोमकूपांतून शोषले जाते.

 

तीळ तेल सर्वाधिक उपयुक्त मानले जाते. ऋतूनुसार सुगंधी खोबरेल तेलही वापरले जाते.

 

रोज अंघोळीपूर्वी ५ मिनिटे अभ्यंग करावा.

 

अभ्यंगानंतर स्वेदन किंवा गरम पाण्याने स्नान करावे. साबण न वापरता उटणे लावावे.

 

 

 

 

अभ्यंगाचे गुण –

 

1. थकवा व ताण कमी होतो.

2. वातदोष शमतो.

3. झोप चांगली लागते.

4. त्वचा मृदू, बलवान व उजळ होते.

5. शरीर कष्ट व आघात सहनशील होते.

6. डोळ्यांची दृष्टी सुधारते.

7. वार्धक्य उशिरा येते व कार्यक्षम आयुष्य वाढते.

स्वेदन

ज्या प्रक्रियेने शरीरास घाम येतो तिला स्वेदन म्हणतात. स्वेदनाने शरीरातील आखडलेपणा, जडपणा व शैत्य (थंडपणा) दूर होतो. शरीर हलके वाटते व मार्ग मोकळे होतात.

 

घरगुती पातळीवर ऊन घेणे, शेकोटी जवळ बसणे, गरम पाण्याच्या पिशवीने शेक देणे इत्यादी प्रकार सामान्य आहेत.

 

परंतु पंचकर्मात स्वेदन ही स्वतंत्र चिकित्सा आहे.

 

स्नेहनामुळे सूटलेले दोष स्वेदनाने कोष्ठात आणले जातात.

 

वात व कफ विकारांमध्ये स्वतंत्र उपचार म्हणूनही उपयोग होतो.

 

 

आयुर्वेदात स्वेदनाचे १३ प्रकार वर्णन केलेले आहेत. आजकाल वाफेच्या पेटीत बसवून किंवा झोपवून स्वेदन दिले जाते.

 

स्वेदनाचे फायदे –

 

1. वात व कफ दोष कमी होतात.

2. अंग हलके व मोकळे होते.

3. भूक वाढते.

4. त्वचा मृदू व प्रसन्न होते.

5. स्फूर्ती येते, स्थूलता कमी होते.

6. सांध्यांची हालचाल सुधारते.

7. भूक व जेवणाची इच्छा वाढते.

 

 

 

जास्त स्वेदन झाल्यास थकवा, चक्कर, त्वचेवर लाल पुरळ होऊ शकतात. त्यामुळे स्वेदन वैद्यकीय मार्गदर्शनाखेरीज नियमित करू नये.

वमन

‘वमन’ म्हणजे औषध देऊन उलटी करविणे.

 

वमन प्रामुख्याने वाढलेल्या कफदोषासाठी केले जाते.

 

सर्दी, खोकला, दमा, त्वचाविकार, अम्लपित्त, मेदोरोग, अॅलर्जी इत्यादींमध्ये उपयुक्त.

 

निरोगी व्यक्तींनी वसंत ऋतूत (फेब्रुवारी–मार्च) वमन केल्यास वर्षभर कफजन्य विकार टाळता येतात.

 

 

प्रक्रिया –

 

आधी ३–७ दिवस स्नेहपान केले जाते.

 

वमनाच्या आदल्या दिवशी कफ वाढविणारा आहार (दूध, खीर, दही, केळी इ.) घ्यावा.

 

वमनाच्या दिवशी शेक दिल्यानंतर औषधी काढा/रस मोठ्या प्रमाणात पिण्यास दिला जातो.

 

साधारण ५–८ लिटर द्रव घेतल्यावर उलटी सुरु होते. प्रथम कफ, नंतर पित्त बाहेर पडते.

 

७०–९० मिनिटांत वमन पूर्ण होते.

 

उलटी झाल्यावर हलकेपणा, मोकळेपणा व ताजेतवानेपणा जाणवतो.

 

 

वमनानंतर –

 

धूमपान चिकित्सा करून उरलेला कफ कमी करतात.

 

३–५ दिवस संसर्जन क्रमाने हलका आहार द्यावा.

 

 

वमन फक्त तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच करावे. चुकीने केल्यास उपद्रव होऊ शकतात.

विरेचन

‘विरेचन’ म्हणजे औषध देऊन जुलाबावाटे दोष शरीराबाहेर काढणे.

 

पित्तदोषासाठी प्रामुख्याने उपयुक्त.

 

त्वचाविकार, कावीळ, दमा, मधुमेह, ताप, मूळव्याध, उदररोग, पचनविकार इत्यादींमध्ये उपयोगी.

 

 

प्रक्रिया –

 

आधी ३–७ दिवस स्नेहपान व त्यानंतर स्वेदन करतात.

 

त्यानंतर ठरावीक दिवशी विरेचन औषध दिले जाते.

 

औषध घेतल्यावर ५–१० किंवा त्याहून अधिक वेळा जुलाब होतात.

 

त्यामध्ये क्रमशः पित्त व कफ बाहेर पडतात.

 

जुलाब आपोआप थांबल्यावर शरीर हलके व ताजेतवाने वाटते.

 

 

सावधगिरी –

 

औषध घेतल्यानंतर पोटदुखी, मळमळ होऊ शकते; घाबरू नये.

 

प्रत्येक जुलाबानंतर थोडे गरम पाणी प्यावे.

 

रुग्णाने वैद्य सांगतील तोच आहार घ्यावा.

 

चुकीने विरेचन दिल्यास उपद्रव होतात.

 

अजीर्ण, जुलाब, हृदयरोग, गर्भावस्था, बाल–वृद्ध दुर्बल रुग्णांना विरेचन देऊ नये.

 

 

विरेचन प्रामुख्याने पित्तदोष किंवा रक्तदोषांवर करतात; परंतु विशिष्ट औषधांच्या सहाय्याने कफ व वात दोषांसाठीही उपयोगात आणले जाते.

नस्य

नाकावाटे औषध देण्याच्या उपचारपद्धतीला नस्य म्हणतात.

 

मस्तक व त्यातील अवयव तसेच इंद्रियविकारांमध्ये ही चिकित्सा विशेष उपयुक्त ठरते.

प्रतिमर्श नस्य हा प्रकार दररोजच्या दिनचर्येत करता येतो. 

औषधाच्या स्वरूपानुसार नस्याचे विविध प्रकार आढळतात, जसे की –

 

स्नेहन नस्य – तेल, तूप किंवा स्निग्ध द्रव्यांचा उपयोग

स्वेदन नस्य – वाफेचा उपयोग

धूम नस्य – औषधी धूर श्वासावाटे घेणे

पौड नस्य – औषधी चूर्ण नाकावाटे घेणे

आसव/अरिष्ट नस्य – किण्वित द्रवांचा उपयोग

बस्ती

औषध गुदमार्गाने आत देण्याच्या प्रक्रियेला बस्ती म्हणतात. ही पंचकर्मांपैकी सर्वात महत्त्वाची चिकित्सा मानली जाते.

 

वातदोष हा सर्व रोगांचा मुख्य कारणीभूत दोष असल्याने बस्तीला ‘आर्धचिकित्सा’ (अर्धी चिकित्सा) असेही म्हणतात.

 

बस्तीचे प्रमुख दोन प्रकार –

 

1. निरुह बस्ती – औषधी काढा देणे

2. अनुवासन बस्ती – औषधी तेल देणे

 

रुग्णाच्या आजारानुसार औषध, मात्रा व कालावधी ठरविला जातो. 

बस्ती नियमित घेतल्यास दीर्घकालीन आजारांवर नियंत्रण मिळते, शरीर सक्षम राहते व वृद्धापकाळात येणाऱ्या व्याधी टाळता येतात. 

उत्तरबस्ती

 

बस्तीचाच एक विशेष प्रकार म्हणजे उत्तरबस्ती.

पुरुषांमध्ये हा उपचार मूत्रमार्गाने, तर स्त्रियांमध्ये योनीमार्गाने केला जातो.

औषध साधारण ५–१० मिली प्रमाणात दिले जाते.

हा उपचार मूत्रविकार, शुक्रविकार, स्त्रीरोग तसेच वंध्यत्व यांमध्ये विशेष उपयोगी आहे.

रक्तमोक्षण

रक्तमोक्षण म्हणजे अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया. शिरांना छेद देऊन त्यातून दूषित रक्त बाहेर काढले जाते. याला सिरावेध असे म्हणतात. सिरावेधाखेरीज जळवा, तुंबड्या किंवा गायीच्या शिंगाच्या साहाय्याने देखील रक्तमोक्षण केले जाते.

 

रक्तमोक्षण हा एक शोधन उपचार आहे. जसे वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन आणि कफासाठी वमन हे शोधन उपाय सांगितले आहेत, त्याचप्रमाणे जेव्हा हे दोष रक्तात जाऊन रक्ताचे विकार निर्माण करतात तेव्हा रक्तमोक्षण करून दूषित रक्त बाहेर काढले जाते. पित्त आणि रक्त हे एकमेकांच्या आश्रयाने राहतात, म्हणूनच रक्तमोक्षण प्रामुख्याने पित्तप्रधान आजारांमध्ये उपयुक्त ठरते.

 

शास्त्र सांगते की – रोगावर शीत, उष्ण, स्निग्ध, रुक्ष असे उपाय करूनही जर रोग बरा होत नसेल, तर रक्तमोक्षण करावे. रक्तमोक्षणाच्या वेळी प्रथम अशुद्ध रक्त वाहते, कारण शरीराची प्रवृत्ती अशी आहे की ते आधी अहितकारक व नको असलेले घटक बाहेर टाकते. रक्त शरीराबाहेर काढताच, शरीरात नवे व शुद्ध रक्त तयार होण्याची प्रक्रिया जोरात सुरू होते. साधारण ४८ तासांत गमावलेले रक्त भरून निघते. रक्तमोक्षणामुळे रक्ताचा चिकटपणा, सांद्रता कमी होते.

 

रानडुक्कर जेव्हा मत्त होते तेव्हा धारदार दगडांवर अंग घासून चिरे पाडते व रक्त वाहू देते, त्याने ते शांत होते – याचा उल्लेख आयुर्वेदात आलेला आहे.

 

स्वस्थ व्यक्तींनाही शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण करायला सांगितले आहे. कारण वर्षाऋतूत पित्त साचू लागते आणि शरद ऋतूत उन्हामुळे त्याचा प्रकोप होऊन रक्त दूषित होते. याच्या उपशमनासाठी कडू औषधांनी तयार केलेली तुपे, विरेचन औषधे व रक्तमोक्षण उपयुक्त ठरतात.

 

रक्तदूष्टी निर्माण करणारे कारणे

 

अति उष्ण, तीक्ष्ण, आंबट, खारट, तिखट पदार्थ; कुळीथ, उडीद, तीळ, बिघडलेले मद्य, दही, खराब अन्न खाणे; जेवणानंतर लगेच झोपणे; दिवसा झोपणे; उन्हात जास्त फिरणे; चिडचिड, राग, शोक, भय – या सर्व गोष्टींमुळे रक्त दूषित होते.

 

यामुळे त्वचाविकार, कुष्ठ, प्लीहा वाढणे, अंगावर फोड येणे, वारंवार तोंड येणे, कावीळ, खाज, मूळव्याध, तोंडावर पुळ्या येणे, सांधेदुखी, यकृतविकार, डोळ्यांचे विकार, चक्कर, उच्च रक्तदाब, गळवे, नाक–डोळे–हिरड्या–मल–मूत्रावाटे रक्त पडणे, अर्धशिशी, डोकेदुखी इत्यादी अनेक आजार होऊ शकतात.

 

रक्तमोक्षण कधी करू नये?

 

ज्यांच्या शरीरावर सर्वत्र सूज आहे, जे अत्यंत थकलेले आहेत, गर्भवती स्त्रिया – यांना रक्तमोक्षण करू नये.

 

रक्तमोक्षणाचा काल

 

मुख्यतः शरद ऋतूत रक्तमोक्षण करावे. अन्यथा फार थंडी किंवा फार ऊन नसलेल्या दिवसांत – ग्रीष्म ऋतूत थंड वेळेस किंवा हेमंत ऋतूत दुपारी करावे.

 

रक्तमोक्षणाचे प्रकार

 

1. शस्त्रक्रियेद्वारे रक्तमोक्षण

 

प्रच्छान – त्वचेवर चिरे पाडून रक्त काढणे

 

सिरावेध – शिरेत छेद देऊन रक्त काढणे

 

 

 

2. शस्त्रविरहित रक्तमोक्षण

 

जळुकावचरण – जळवा लावून रक्त शोषणे

 

शृंगावचरण – गायीचे शिंग लावून रक्त काढणे

 

अलाबूवचरण – तुंबड्या लावून रक्त काढणे

 

घटीयंत्र – पोकळ भांड्याच्या साहाय्याने रक्त शोषणे

 

 

  संपूर्ण शरीरातील रक्त दूषित असल्यास सिरावेध करतात. स्थानिक रक्तदूष्टीसाठी जळवा लावतात. त्वचेतील सुप्त रक्तदूष्टीसाठी शिंग किंवा तुंबड्या, तर एका जागी जमलेल्या रक्तासाठी प्रच्छानकर्म करतात.

 

कफदूष्टी – तुंबड्या

पित्तदूष्टी – जळवा

वातदूष्टी – शिंग

 

 

तुंबी (कद्दू) कडू–तिखट व रुक्ष गुणांची असल्यामुळे कफदूष्टीत उपयुक्त. जळवा शीत व मधुर गुणांच्या असल्यामुळे पित्तदूष्टीत आणि विशेषतः सुकुमार रुग्णांत उपयुक्त. शिंग हे स्निग्ध, मधुर, उष्ण गुणांचे असल्यामुळे वातदूष्टीत उपयुक्त.

रक्तमोक्षणाची प्रत्यक्ष प्रक्रिया

 

पूर्वकर्म – रुग्ण रक्तमोक्षणास योग्य आहे का, कोणत्या पद्धतीने करावे, हे त्याच्या शक्तीप्रमाणे ठरवावे.

 

रक्तमोक्षणापूर्वी रुग्णाला पेज, सूप, कढण किंवा दह्याची लस्सी द्यावी.

 

रुग्णाला बसवून किंवा झोपवून सूईने शिरेचा वेध घेतला जातो.

 

 

जळवा वापरण्याची पद्धत

 

एखाद्या ठरावीक भागाचे रक्त काढण्यासाठी जळवा वापरतात.

 

तारुण्य पिटिका, सांध्याची सूज, चाई पडणे, त्वचाविकार, मुका मार, गळू, ठणका असलेले भाग – अशा ठिकाणी जळवा लावतात.

 

जळू पाण्यात राहणारी अळी असून एका बाजूने चिकटते आणि दुसऱ्या बाजूने चावून रक्त शोषते. प्रत्यक्षात फारच कमी वेदना होतात, त्यामुळे बालक व सुकुमार रुग्णांतही सहज वापरता येतात.

 

जळवा चावल्यावर Y आकाराचा लहानसा वण तयार होतो, जो काही दिवसांनी नाहीसा होतो.

 

 

जळवा वापरल्यानंतर –

 

त्यांना हळदीच्या पाण्यात ठेवून प्यायलेले रक्त बाहेर काढावे, अन्यथा त्या मरतात.

 

एकदा वापरलेली जळू ७–१० दिवसांनी पुन्हा वापरता येते.

 

वापरण्यापूर्वी ३०–४५ मिनिटे हळदीच्या पाण्यात ठेवल्यास त्या तरतरीत होतात.

 

जळवांच्या लाळेत हिरुडीन नावाचे रक्त गोठू न देणारे द्रव्य असते. त्यामुळे त्या आपोआप सुटतात. गरज असल्यास मीठ किंवा हळद तोंडाशी लावून सुटवता येतात.

रक्तमोक्षणानंतरची आहार–विहार काळजी

 

हलका, स्निग्ध, वातशामक आहार – पेज, सूप, कढण.

 

खूप थंड, खूप गरम किंवा जड पदार्थ टाळावेत.

 

रक्तवर्धक आहार घ्यावा.

 

राग, चिडचिड, दिवसा झोप, रात्री जागरण, श्रम, मैथुन, उन्हात फिरणे टाळावे.

 

आगीजवळ काम करू नये.

निष्कर्ष

 

रक्तमोक्षण हा अत्यंत गुणकारी, सोपा, लवकर आटोपणारा आणि तत्काळ परिणाम देणारा शोधन उपचार आहे. म्हणूनच आयुर्वेदात त्याला ‘अर्धचिकित्सा’ म्हटले आहे. सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी यांसारख्या अनेक आजारांमध्ये तो प्रभावी ठरतो.

© Copyright 2025 Aarogya Sarthi Chikitsalya

bottom of page